
व्याकुळलो तुझ्या गोड शब्दासाठी
भूक जगजेठी भागवेना
स्नेहाविना तुझ्या व्यर्थ ही चाकरी
कोरडी भाकरी गिळवेना
जड झाला जीव तुझ्याविना रामा
काय येई कामा पैसा तुझा
आसतुटी मज केलेस तू रामा
देवा तुझ्या प्रेमा आसुसलो
दर्शनासी द्यावे उदार होउन
उगा कोते मन करू नये
नको सायुज्यता नको सरूपता
दे गा समीपता दयाघना
दास्य सख्य भक्ति दे रे रामराजा
विरहाची सजा नको नको
चुकता मी मंद तुही क्रोध कर
परि असा दूर लोटू नको
क्षमेच्या समुद्रा येत जा भेटीला
रे माझ्या जिवाला चैन नाही
ॐ
।। राम कृष्ण हरि ।।