शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

अद्वैत

नंदी आणि शिव 
काढले कोरून 
एकच पाषाण 
द्वैत नाही 

लाट व सागर 
एकच ते जळ 
वेगळे केवळ 
नाम रूप 

लाटेचे जन्मणे 
लाटेचे विरणे 
लाटेचे जगणे 
सागरात 

ईश्वरा वेगळे 
आस्तित्व तुजला 
नाही माझ्या मुला 
 ऐक माझे 

तूच माझा राम 
तू माझा गोविंद 
तू सच्चिदानंद 
परब्रह्म 

आत्मा परमात्मा 
एकच आहेत 
आत्मबोध यात 
आला सर्व 

सजीव निर्जीव 
सारे आत्माराम 
अज्ञानाचे काम 
नाही नाही 

ॐ  

रविवार, २१ मे, २०१७

अश्रू



अश्रू नको ढाळू 
माझ्या रामराया 
येईन भेटाया 
तुजप्रती 

आपला विरह 
तुज साहवेना 
मज राहवेना 
तुझ्याविना 

अपवित्र देह 
माझा जिवलगा 
 करीतसे त्रागा 
माझे मन 

मलिन ही काया 
माझी घेऊनिया 
कसा येऊ राया 
भेटीस्तव

म्हणून मी दूर 
राहतो राघवा 
   अन्य काही कावा 
नाही माझा 

सोवळे ओवळे 
सांभाळावे किती 
आहे मंदमति 
भक्त तुझा 

सदा तू पवित्र 
पतितपावना 
तुझ्या पूजा-यांना 
उमगेना 

म्हणे मज देव 
सख्या भेटी येई 
अंतराय नाही 
देणार मी 

ॐ 

रामा मजवर 
ऋण झाले फार 
ना दिले अंतर 
पापियासी 

घेतले जवळ 
मायबापापरि 
स्थान दिले उरी 
लेकरासी 

कसे पांग फेडू 
अनाथाच्या नाथा 
टेकविला माथा 
तुझ्या पदी  

 जन्मोजन्मी तुझी 
करीन मी सेवा 
बळ देई देवा 
बाळकासी 

तुझे नाम घेता 
फिटे दैन्य माझे 
होई नष्ट ओझे 
पातकांचे 
       
ॐ 



बुधवार, २६ एप्रिल, २०१७

श्रीरंग



देव धावतो पळतो
देव आनंदे खेळतो

गोवर्धन उचलतो
नाना लीला दाखवतो

देव भक्तांसी पावतो
देव धेनूंसी चारतो

देव वेणू वाजवितो
मित्रांसी आमोद देतो

माये तुझे उपकार
माझा श्रीरंग सुंदर

परब्रह्म निराकार 
केले तया तू साकार

आला भक्तांचिया कामा
नमस्कार मेघ:श्यामा

ॐ 


गुरुवार, २३ मार्च, २०१७

अतिसुख



रंग बोलतो 
सुवास बोलतो 
वैविध्यही बोलत आहे 

अंधार बोलतो 
शांतता बोलते 
एकत्वही बोलत आहे 

आनंद बोलतो 
उल्हास बोलतो 
घनवनराई बोलत आहे 

डोंगर बोलती 
द-या बोलती 
हसरा झरा बोलत आहे 

दगड बोलती 
शिंपले बोलती 
निवांतपणा बोलत आहे 

स्वर बोलती 
आलाप बोलती 
अतिसुख हे बोलत आहे 


शनिवार, ४ मार्च, २०१७

अनुभूती



ॐ 

अलौकिकाचा हात धरावा 
लौकिक सारे सुटून जावे 
तुझी ईश्वरा अनुभूती येता 
जग हे सारे लयास जावे 

मर्जी तुझी का माझ्यावर ही 
कधी ना याचे गणित सुटावे 
वेड लागले नादखुळ्याला 
मजवर जग हे असे हसावे 

मी का गुंतू जगदाभासी 
रहस्य यांना कसे कळावे 
लडबडले कर्मातच सारे 
समाधीसुख यांना ना ठावे

भान रहावे तव एकाचे 
तू माझ्यावर प्रेम करावे 
पर्वा नाही कुणाची असे 
भक्तीमध्ये रममाण मी व्हावे 

अद्भुत नाते तुझे नि माझे 
सगळे जगत अचंभित व्हावे 
असे करू नको असे करू नको 
जगाने मला समजावावे 

ॐ 

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.