अश्रू नको ढाळू
माझ्या रामराया
येईन भेटाया
तुजप्रती
आपला विरह
तुज साहवेना
मज राहवेना
तुझ्याविना
अपवित्र देह
माझा जिवलगा
करीतसे त्रागा
माझे मन
मलिन ही काया
माझी घेऊनिया
कसा येऊ राया
भेटीस्तव
म्हणून मी दूर
राहतो राघवा
अन्य काही कावा
नाही माझा
सोवळे ओवळे
सांभाळावे किती
आहे मंदमति
भक्त तुझा
सदा तू पवित्र
पतितपावना
तुझ्या पूजा-यांना
उमगेना
म्हणे मज देव
सख्या भेटी येई
अंतराय नाही
देणार मी
ॐ
रामा मजवर
ऋण झाले फार
ना दिले अंतर
पापियासी
घेतले जवळ
मायबापापरि
स्थान दिले उरी
लेकरासी
कसे पांग फेडू
अनाथाच्या नाथा
टेकविला माथा
तुझ्या पदी
जन्मोजन्मी तुझी
करीन मी सेवा
बळ देई देवा
बाळकासी
तुझे नाम घेता
फिटे दैन्य माझे
होई नष्ट ओझे
पातकांचे
ॐ