रविवार, ३१ जुलै, २०११

कार्य



कार्यही करावे भार मानु नये
करणारा आहे रामचंद्र

कर्तबगारीने फुगू नये आम्ही
अपयशानेही खचू नये

रामाच्याशिवाय पानही हलेना
जाणून हे घ्या ना सत्य मनी

सर्वशक्तिमान असताना राम
आम्ही कोण काम करणारे

जेवढी ताकद आम्हा दिली त्याने
तेवढे करणे जीवेभावे

दुस-यांच्या कार्याकडे पाहू नये
स्पर्धा करू नये दुस-याशी

आळस सोडून यत्न चिकाटीने
करीत राहणे झेपेल ते

त्याच्या इच्छेवर झोकुनिया द्यावे
व्हायचे ते व्हावे परिणाम

राम सूत्रधार सद्गुरु बोलले
आपण बाहुले बळहीन

मिळेल तेवढी भाकरी खाऊनी
राहू समाधानी हरीकृपे



शनिवार, ३० जुलै, २०११

सद्भाग्य



वाल्याने केवढे पाप केले होते
त्यालाही भेटले नारदजी

कुणाचे सद्भाग्य केव्हा उजाडेल
सन्मार्ग दिसेल काय सांगू

माझा अनुभव आहे चमत्कार
विशवास होणार नाही तुम्हा

तुमचेही दु: असे कदाचित
तुम्हा सोसवत नाही जरी

तरी तुम्ही धीर धरून हो रहा
नाम घेता पहा सुखी व्हाल

नाना व्यसनांनी जग भरलेले
भोगासाठी चाले धावपळ

भौतिक सुखाच्या पाठी आहे दु:
क्रौर्याचा अतिरेक सा-या जगी

किती धावणार आणि कुणासाठी
एकटे शेवटी पडणार

जगती वात्सल्य पोटात आईच्या
दुसरे गुरुंच्या ह्रदयात

नाम मुखी घ्या हो श्रद्धेने देवाचे
सकळ तीर्थांचे स्नान जणू

सारी आटापिट सोडून देताल
विश्रांति मिळेल एका ठायी

जगण्यास फार ना लागे साधन
चित्ती समाधान असल्यास

शांतता आनंद तुम्हाला मिळेल
सुखाने कराल नामजप

नाम मुखी घ्या हो नाम मुखी घ्या हो
फोडतात टाहो संत जगी

तुमचा उद्धार तुमच्या हातात
तुमचे हे हित तुम्ही जाणा

घ्या हो गोड माझ्या श्रीरामाचे नाम
त्याने सुखधाम पावताल



गुरुवार, २८ जुलै, २०११

प्रश्न ?



सद्गुरुंनी केले आयुष्याचे सोने
नसता माझे जिणे व्यर्थ होते

विठ्ठल भेटला मज त्यांच्या कृपे
हरली सारी पापे आयुष्याची

काय मिळविणे कशाला जगणे
कोड पुरविणे इंद्रियांचे

पशुवत जगणे का आले वाट्याला
प्रश्न हा पडला होता मला

हरि भेटला अन प्रश्न विसरलो
दर्शनाने झालो आश्वस्त मी

माणसाला हवा स्पर्श पावित्र्याचा
दाखला युगांचा घ्या हो तुम्ही

दिव्यत्वा भेटण्या असे आसुसला
बिंदु हा सिंधुला मिळण्यास

विश्वाची रहाटी हरि चालवितो
मज भेटला तो पांडुरंग

विश्वाचे कारण पाहता साक्षात
जाहलो निवांत बाळापरी

आईच्या कुशीत असता बाळास
प्रश्नांचा प्रयास पडतो का

गोड झोप घेणे भुकेला रडणे
निर्व्याज हसणे बालकाचे

तैसी स्थिति झाली प्राप्त मज आता
डोळ्यापुढे त्राता हरि दिसे




शनिवार, २३ जुलै, २०११

अभयदान



गोड दोन शब्द पुरे
आम्हा तापसांना
काय करू घेऊन या
लंकेच्या राज्याला

तू स्वामी लंकेचा
सुखे राज्य कर आता
सहज पुढे आलेल्या
पार पाड कर्माला

बिभिषणा दे निरोप
परत चाललो आम्ही
लंकेच्या राजा तू
सांभाळ या नगरीला

नीतीचे पालन कर
व्यर्थ नको घेऊ वैर
शांतता समृद्धि
मिळो आता लंकेला

बैरागी आम्ही सगळे
गळा पडे युद्ध बळे
जरी हरली लंका तरी
देतो अभयाला


शुक्रवार, २२ जुलै, २०११

निश्चय



घडावया हवे होते
ते ते सारे घडत गेले
जानकीला कांचनाच्या
नाही मोहाने ग्रासिले

असुरांच्या विध्वंसाचा
चंग सीतेने बांधला
कर्तव्यास त्या धाडला
श्रीराम नाही फसला

दुष्ट मायावी शक्तींचे
व्हावे समूळ उच्चाटन
म्हणून गेला लंकेला
माग दाविला काढून

राम
लंकेस येईल
होती जानकीला खात्री
पार पाडली रामाने
त्याची सर्व जिम्मेदारी

क्रीडा प्रकृति पुरुषाची
लोकांसाठी आदर्शाची
चुकून नाही घडली
दिव्य गाथा निश्चयाची

नम: प्रकृतिपुरुषाय शाश्वते
*

बुधवार, २० जुलै, २०११

शबरी



उभा
श्रीपती राम कोदंडधारी
दैत्यांसी
निर्दाळी मज अंगिकारी
सदा
सज्ज कार्यार्थ जनहितकारी
जपे नाम रामाचे मम वैखरी

रामा
तुझी वाट मी पाहते रे
तुझ्यासाठी मी गोड खाऊ आणला रे
भेटण्यास येशील तू खात्री आहे रे
कुपाळू
आहे तू मला माहिती रे

जगाचा पोशिंदा आहेस तू रामा
तुझे
नाम कामा येई माझ्या

अन्य
साधन मज कळो आले
डावपेच गेले वा-यावर

बुद्धि गेली वाया चोथा झाली काया
मला जगवाया रामनाम

-या वाईटाचे भान राहिले
सारेच चांगले तुझ्या नामे

भिल्लिणीची व्याप्ति जंगलापुरती
प्रत्युत्पन्नमति मज केले

ऐसा तुझ्या रामा नामाचा महिमा
वर्णाया उपमा नाही नाही

उष्टावली बोरे माझा गोड रानमेवा
सुग्रास नैवेद्य देवा पोटभर खावा
माझ्या सुखासाठी रामा स्वीकार ही सेवा
शेष ठेऊ नको देवभक्तात दुरावा

तुझी गोड मूर्ति माझ्या नेत्री ठसवावी
श्रीरामा ही भोळी भक्ति पावन करावी

लेशमात्र अन्य आस माझी ना उरावी
तुझ्या पायी रामचंद्रा मुक्ति मज द्यावी




शुक्रवार, १५ जुलै, २०११

पहाट


अश्रूंचा पाउस पडतो
स्वप्नांचे नभ भळभळते 
रस्त्यात चिखल रक्ताचा
आक्रोशही विझले होते

धर्मास फोडणी मिळते
राष्ट्राच्या अभिमानाची
नावाखाली कुठल्याही
हिंसेची चलती होते

जाईना सुखाचा घास
नरड्यात पिसाट खुन्यांच्या
केला न गुन्हा कोणीही
तरी सूडचक्र भिरभिरते

मी वेडा झालो देवा
प्रश्नांच्या पर्वतराशी
तू मौन होऊनी बसला
कोणतेच उत्तर नव्हते

या मिट्ट काळरात्रीत
जरी नाही किरण कुठेही
मी घेतो वेध उद्याचा
मग सूर्यबिंब मज दिसते

चालणार येणे जाणे
थांबणार नाही रहाटी
प्रलायांतीही विश्वाच्या
नवे ब्रह्मांड उगवते 


*

शुक्रवार, १ जुलै, २०११

राज्याभिषेक



राम माझा देव
बसे सिंहासनी
अयोध्येची राणी
सीता माझी

कैवल्यनायक
त्रिभुवननाथ
जानकीचा कंथ
राज्य करी

हरखला जीव
ओवाळी आरती
लक्ष नेत्रज्योती
तेजाळल्या

राजांचाही राजा
शोभतो श्रीहरी
लक्ष्मीशेजारी
कृपावंत

लाडका हा लाडू
कौसल्येचा बाळ
रावणाचा काळ
प्रजाप्रिय





माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.