बुधवार, २५ जुलै, २०१२

कर्म


आदि अंती नाही 
संसार अनित्य 
आहे ब्रह्म सत्य   
तिन्ही काळी  

आत्मा अधिष्ठान  
नित्य सत्तारूप 
अकर्ता निर्ले
अविकार


कर्म हे चुकेना  
 इंद्रियांसी जाण
स्वभावा आधीन 
वागतात 
.
 आत्मचैतन्यास 
कर्म ना बाधत 
इंद्रिये वर्तत 
गुणवश 

ज्ञानीही विहित 
कर्म करतात 
प्राप्त ते होतात 
नैष्कर्म्यास 

ज्ञान कर्म भक्ति 
तिघांची सांगड 
नाही अवघड 
ज्ञानयोग्या  

हेतू विरहीत 
कर्म नसे त्याज्य 
फलाशा ती व्यर्ज्य 
सुखे कर 
*
शुभ दिपावली 
*

गुरुवार, १९ जुलै, २०१२

गणेश


परब्रह्म स्वये घेई अवतारा 
आनंद साजरा करावया
.
थंड दुर्वांकुर तुरा माथ्यावर
 जास्वंदाचा हार गळ्यामध्ये 


अथर्वशीर्षाचा गंभीर उच्चार 
विघ्नबाधा दूर नाम घेता 


गणेश लीळेचे करुया कौतुक 
मोदक साजूक देऊ त्याला
.
नाचूया आनंदे वाजवीत ढोल 
उधळू गुलाल समाधाने
.
ताशा तडाडता पाय थिरकावे
लेझीम खेळावे हर्षोत्फुल्ल


करू रोषणाई देखावे सुंदर 
देवा राज्य कर दिमाखाने

ॐ गं गणपतये नम:


बुधवार, १३ जून, २०१२

कमळ


हलकल्लोळ भोगाचा 
 विचका झाला आयुष्याचा 

नको धन आणि मान
साधे सरळ जीवन 

कृपा असू दे गा देवा 
नको भोगाचा पुंडावा 

मातीमध्ये खेळे बाळ
डोई वरती आभाळ 

तसे निष्पाप निर्मळ
जणू तळ्यात कमळ

व्हावे संतुष्ट जीवन
 समाधानी निष्कारण
    
तळहातावर रोटी 
भाजी देरे पोटासाठी 

नाही आस काही अन्य
व्यर्थ खेदाचे कारण

ॐ   

रविवार, २७ मे, २०१२

नशीबवान


झाडाच्या बुडाला
दाट सावलीला
बस चुपचाप
खिनभर वाईच

धावपळीचीबी
मजा येगळीच 
पर पळशील 
कितीक उगाच 

भाकरी भरीत 
खाशील उलुसं 
सुखाचं जीवन 
नशीबवानाचं 

हीर भरलेली 
गार गोड पानी 
 पिऊन झकास 
थंड तू व्हायचं 

राम नाम घे रे
जाशील तू पार
उगा चिंता घोर
करूबी नगंच
 
ॐ 
  

सोमवार, ३० एप्रिल, २०१२

याचना


वाचुनीही बहु शास्त्रे अंतरी कधी ना भिजलो 
दिशाहीन भरकटते तारू तैसे आम्ही 

हळहळतो जीव आमुचा कळकळते मन 
टाकुनी बोललो देवा शिवरामा तुज आम्ही 

सर्वांसाठी दर्शन देतो तू शिवरामा 
कुठवर तुझा प्राण कोंडावा उगी आम्ही 

क्रोध सोडुनिया व्हावे शिवरामा तू सदय 
अगाध स्वरूप तुझे समजलो नाही आम्ही

आम्हासाठी प्रतिपाळका भोगतोस कष्ट 
समजू शकलो नाही तुझा वरदहस्त आम्ही 

शांत हो शिवरामा शांत हो बा देवा 
प्रखर तुझे तेज असे साहू कसे आम्ही 

करुणावरुणालया माफी आम्ही मागतो
सर्वांसी गाभारा खुला करतो आम्ही  

रविवार, २९ एप्रिल, २०१२

रत्नदीप



आषाढस्य
प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सांतु
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीय ददर्श

शब्दायन्ने मधुरमनिलै:कीचका:पूर्यमाणा:

संसक्ताभिस्त्रिपुरविजयी गीयते किन्नरिभि:

निर्हादस्ते मुरज इव चेत्कन्दरेषु ध्वनि:

स्यात्सङ्गितार्थो ननु पशुपतेस्तत्र भाठी समग्र:      
*
योगमायेचे पडळ ज्याने अढळ केले आहे
त्या विश्वंभर दयाब्धिचा पाठविला माझ्या घरी
हा दिवा आसवांचा तू पेटविला नव्हतास

तू नजराणा दिलास मजसी अत्तराचा रत्नदीप 
*

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।
ॐ 

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

हे विश्वचि माझे घर


सर्वांचा मी आहे 
सर्व आहे माझे 
गणगोत माझे 
विश्व सारे

मीच भरलेलो  
 त्रिखंड पृथ्वीत 
कोंदलो विश्वात 
 अवघा मी 

माझे नाही असे 
काय या जगात 
उणे ना कशात 
मज काही 

डोंगरापरीस 
मोठे माझे सुख 
तिळभर दु:ख 
नाही मज 

कमतरता ती 
स्वये गेली वाया 
कृपा विठू राया 
तुझी झाली 

सर्वांचे सगळे 
 होऊन बसलो     
ब्रह्मानंदी न्हालो 
याचि देही  
 ॐ  
हे विश्वचि माझे घर 
ऐसी मति जयाची स्थिर 
किंबहुना चराचर 
आपण जाहला 


ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
   ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।
ॐ 

शनिवार, १४ एप्रिल, २०१२

पाठराखण


आहे उभा श्रीराम स्वयंभू पाठराखणीला
सांगा भीती असे कोणाला । । धृ । ।

कधी न वावगा शब्द बोललो
वसा टाकुनी कधी न मातलो
वेदवाणीचे तेज असे 
या प्रखरही बोलाला
सांगा भीती असे कोणाला । । १। ।

घडते जे त्याच्या संकेते
वरकरणी विपरीत वाटते
अधिष्ठान ईश्वरी सकळ
या उज्जवल कार्याला
सांगा भीती असे कोणाला । । २। ।

विभुर्व्याप्य श्रीहरी प्रगटला 
मनोरथावर आरूढ झाला 
देह वारू त्याच्या इच्छेने 
न्यावे तेथे गेला 
सांगा भीती असे कोणाला । । ३। ।

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

मृत्युंजय


ॐ नम: शिवाय 
 *
काय त्या विषाचे 
मोल असे बाबा 
अमृताचा गाभा 
सुखरूप 

अनर्घ्य चोखडे 
रत्न चिंतामणी 
कामधेनु दानी 
तुझी इच्छा 

तुझी अन्नपूर्णा 
विश्वाचा तू भर्ता 
पुत्र विघ्नहर्ता 
तुझा आहे 

तात परब्रह्म 
माय परब्रह्म 
बाळ परब्रह्म 
भेद नाही  

तुज काय कमी 
सांब सदाशिवा 
आशुतोषा देवा 
अनिकेता 

मंथनाचे कष्ट 
इतर दैवतां 
 तूच कृपादाता 
सकळांसी  

तूच देव साई 
होऊनिया आला 
कलियुगी झाला 
तारक तू 

*
ॐ नम: शिवाय 
ॐ 
त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम्
उर्वारुक्मिवबन्धनान् मृत्योर्मोक्षियमामृतात्
ॐ 
  

शनिवार, ३१ मार्च, २०१२

कुटुंबवत्सल राम

 
क्षणोक्षणी रामा तुझा सहवास 
माझा श्वासोश्वास तुझ्या सवे 

प्रत्येक घटना तुझीच रे लीला 
मज प्रेमळाला साथ तुझी 

तुझेच बोलणे तुझेच ऐकणे 
तुझाच असणे माझे नित्य 

माझा तूच रामा मीच तुझा भक्त 
आठवावे फक्त नाम तुझे 

ओवाळले माझे रामा मी जीवन 
गण गोत्र मान तूच माझा 

तुजवीण नाही अन्य गती मती
ज्ञान शक्ती भक्ती तूच एक 

मजसी कृपाळा अन्य ना आधार 
श्रीराम उदार सखा स्वामी 

अगा रामचंद्रा कन्या माय तात 
पुत्र दारा वित्त सारे तूच 

काय केले पुण्य जाणत मी नाही 
परमकृपा ही मिळे कैसी 

स्वीकारुनी मज कृतार्थ केलेस 
जन्मोजन्मी दास उद्धरी बा 

बुधवार, २८ मार्च, २०१२

श्रीरामझुला


रानात साऱ्या कोकिळांनी शब्द माझा गायिला
रानफुलांनी आगळा हा रंग माझा ल्यायला 
गर्द हिरवा साज माझ्या जंगलाने नेसला 
 भाळीचा हा स्वेदबिंदू दव पहाटे जाहला 
गूढ हा आलाप माझा या धुक्याने ओढला 
खळबळाटाने झ-याच्या चाळ पायी बांधला 
येथ मी कोठून आलो युगसहस्त्रांचा झुला 
जाऊनी येणे पुन्हा मी शब्द हा तुजसी दिला 
शिव्याशापांचा जगी या नका देऊ दाखला  
जगी विखार जळजळता कुणी कुणावर फेकला 
 अन्य आता स्पर्श माझ्या उगा कायेला कशाला 
मानवी अलवार ऐसा देह आहे लाभला 

ॐ श्रीराम

गुरुवार, १५ मार्च, २०१२

नाम



देवा, मी व्याकुळ झालो आहे मला नेमके काय करावे ते समजत नाही.मात्र तुझे नाम तारक आहे.माझे दोष पर्वताएवढे असले तरी ते भस्मसात करण्याची ताकद तुझ्या नामात आहे. आणि तुझ्या नामाशिवाय माझे कोणीच नाही हे जाणून मी तुझे नाम उरी धरले आहे.त्यासंदर्भात प्रत्यक्ष सैतान देखिल माझे मन कलुषित करण्यास आला तरी तो स्वत: पराभूत होईल हे मी जाणतो.माझे बरे वाईट कर्म देखिल मी तुला अर्पण केले आहे. माझी एवढी लायकी नाही की मी करतोय ते भले आहे की बुरे आहे ते मला समजावे.मी शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही.जे काही थोडे थोडके जाणतो ते देखिल तुलाच अर्पण केले आहे.तूच माझा तारणहार आहे.तू मला दिशा दाखव तूच माझा उद्धार कर.

हरि उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षणमात्रे

तृण अग्नीमेळे समरस झाले
तैसे नामे केले जपता हरि

तृणीकृत्य जगत्सर्वम् राजते सकलोपरि
पूर्णानंदमयम् शुद्धम् हरेर्नामैव केवलम्


शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

शिदोरी



-याच वेळा मनुष्याला आपल्या मनात काय असते ते किंवा आपले काय म्हणणे असते ते ओळखता येत नाही.त्यामुळे आपण मानसिक आजाराला बळी पडलो आहोत कि काय असा संशय येऊ लागतो परन्तु आपल्या मनातील विचारांचा, भावनांचा थांग लागल्यावर प्रश्न किती सोपा होता ते लक्षात येते.नंतर प्रश्नही विरघळून जातो आपले मन प्रसन्नतेने भरून येते पुढच्या जीवनप्रवासासाठी आनंदाची शिदोरीच आपणांस मिळते जी आपला पुढचा जीवनप्रवासही सुखकर करते.बर-याचदा आपणांस काय पाहिजे ते आपणांस माहीतही असते परन्तु समाजाच्या भ्रामक दडपणामुळे आपण त्यावर दुसरीच इतकी पुटे चढवितो कि मुळात आपल्या मनाची मागणी काय होती हेच अस्पष्ट होऊन जाते.अशावेळी आपल्या मित्रांचा वडीलधा-यांचा योग्य तो आधार मिळाल्यामुळे आपली वाटचाल सोपी होते कारण काही गुंता आपला आपण स्वत: सोडविणे शक्य नसते.

ज्यावेळी आपला एक माणूस सावंतवाडीचा असतो त्याच वेळी तो महाराष्ट्राचा असतो, त्याच वेळी तो भारताचा असतो, त्याच वेळी तो आशियाचा असतो, त्याच वेळी तो जगाचा असतो. अशाच प्रकारे हा परीघ विस्तारत ब्रह्मांडा पर्यंत जातो.अहं ब्रह्मास्मि या वेद वाक्याचा अर्थ हेच सांगतो कि भक्त हाच भगवंत आहे आणि आपण आपल्या आपापसातील नात्यांच्या अंतरंगात हाच अर्थ उमटलेला प्रत्यक्षातही पाहू शकतो.ही गमतीशीर गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असते परंतु आपल्याला त्याची कल्पनाच येत नाही.हे निर्मळ आनंदाचे गुप्त धन खरेतर आपल्या जवळच असतो.मात्र स्वत:कडे भक्तपणा घेऊन इतर सर्व विश्वात भगवंताला पाहिले तरच भक्तीचा खरा आनंद आपणांस घेता येतो.ही गोष्ट अनेक प्रकारे भक्त व भगवंत यांच्या नात्यास पोषक ठरते व हेच योग्य असते कारण जे लाभत नाही त्याचा ध्यास घेऊ नये असे नसून आपण लौकिक दृष्टीने जे नसतो ते आपण आहोत असे हे लोकांच्या लक्षात येइल अशाप्रकारे बडबडू नये तर आपण अलौकिक आहोत असे आपले आपणच फक्त समजुन घ्यायचे असते.

काही नाती अशी असतात कि ती एकाच वेळी माता, पिता, सखा, बंधू अशी अनेक रुपे धारण करतात अशा अनेकपदरी नात्यांचा वेध घेणे फारच दुरापास्त होऊन बसते या संमिश्र भावनांचे कल्लोळ आवरता येत नाहीत तसेच प्रगटही करता येत नाही.अशावेळी आपल्या व्यक्तित्वाच्या चिंधड्या झाल्यासारख्या वाटतात.खरेतर आपल्या अध्यात्मात अशा गोष्टींचा उल्लेख केलेला नाही असे नाही परन्तु आपण त्यादृष्टीने आपल्या पारंपारिक ठेव्याकडे पहात नाही.आपण देव पाषाणमुर्तींमधे शोधतो आणि माणसांतला देव हरवतो. अशावेळी आपण एखाद्या मुलीबरोबर एक मुलगा पाहतो तेव्हां आपण गृहीत धरतो कि वाईट संबंध असतील.कृष्ण हा बालक होता तेव्हां ते आपल्या लक्षात येत नाही कि ते एका बालकाचे गोपिकांशी मधुर संबंध आहेत; कृष्णाचे मधुर संबंध आहेत ते परमात्मा या भूमिकेतून आहेत व ते त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या गोपिकांशी नसून आत्मा व परमात्मा यांचे मिलन आहे.हाच प्रकार कोणत्याही व्यक्तींमधील जवळीकीस आजच्या काळातही लागू होतो.कारण ते त्रिकालातीत अमृततत्व म्हणजेच भक्त-भगवंताचे अनेकपदरी नाते कोणत्याही व कितीही व्यक्तींना लागू होते व अशी मैत्री गैर अर्थाने घेऊ नये एवढेच नव्हे तर ते दोषदृष्टीने पाहणे अक्षम्य पाप असते.

एक हात पूर्वजांच्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, प्रेषित मुहमद, भगवान बुद्ध, प्रभु येशु, आदि सर्व मुक्तमौक्तिकांच्या अनादी अनंत मालिकेतील सर्व पुर्वसुरींच्या हाती देऊन दुसऱ्या हाताने वर्तमानाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळो हीच सर्वव्यापी ईश्वराच्या चरणी प्रार्थना.
माता रामो मत्पिता रामचंद्र:
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु:
नान्यं जाने नैव जाने जाने

सच्चिदानंदाचा येळकोट
*
हरि ॐ तत्सत्
*

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

एकांत




आकांत मांडिला असता
मी, माझिया गणेशाने
कृपा करुनी मजवरी
केला हा भवरोग बरा

चांचुवरी पाखरा
बाळ घालीतसे चारा
कोण कुणा भरविते
एक मुख एक चारा

देणारा ईश्वर आहे
का चिंता करीसी माये
मी खातो तुही खा गे
हा विलाप नाही खरा

कासाविस का झालीस
मी पुसतो अश्रु तुझे
मी असताना तू उगाच
सोडणार नाही धीरा

तू निवांत हो गे माये
मी कुशीत तुझिया आहे
बसलेलो तुला धरून
एकांत नाही हा खरा

दिवोरातिचे उठले ठाणे
तुटले धरणे प्रपंचाचे
जीवनमुक्तदशा जाहली
पाहिला चतुर्थी दिन हा खरा

*
हरि ॐ तत्सत्
*

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

दुष्टचक्र



व्यसनांमधे कितीही भोगांची आहुती टाकली तरी त्यांची आग शमण्याऐवजी अधिकाधिक भडकतच जाते. धुण्याचा पिळा पुन्हा पुन्हा वर उंच फेकून खाली आपटतात त्याप्रमाणे आपण तृप्तीच्या पुन्हा अतृप्तीच्या लाटांच्या आन्दोलनांवर लाचार होऊन उंच फेकले खाली आपटले जात राहतो.आपण लाचार गुलाम झाले आहोत हे अनुभवास येऊनही व्यसनांची गुलामगिरी आपण कितीही प्रयत्न करूनही सोडू शकत नाही. आपण त्यात पोळत असतो परन्तु त्यातून सुटण्याचे सामर्थ्य आपणांत रहात नाही.

असे असेल तरीही भगवंताचे नामस्मरण हा या दुष्टचक्रातुन सुटण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग नेहमीच सहजतेने कुठेही उपलब्ध असतो. भगवत्प्रेम हे माणसाला वाटेल त्या संकटातून बाहेर काढते भगवद्भक्तिमुळे माणसातच माणसाला भगवंताचे दर्शन होते.निराकार निर्विकार भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचे मनुष्यदेहात दर्शन होणे हे याचि देहि याचि डोळा शक्य आहे ही खात्री प्रत्यक्ष भगवंतानेच दिलेली आहे.


काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग

*
हरि ॐ तत्सत्
*

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.