शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

प्रसाद



तुझे नाम सोपे गाईन विठ्ठला
अन्य काही मला छंद नाही
काहीच सुचेना तुझ्याविना रामा
जीभ तुझ्या नामा घोकतसे

तुझ्याच रुपाचा नयनांस ध्यास
जीव कासाविस तुझ्यासाठी

जळो
ते रुपये जळो कामकाज
माझी तजवीज रामा करी
अनन्य भक्ती तू देशील गोविंदा
मज मतिमंदा पोसशील
तुझा बळहीन गुलाम मी देवा
भरोसा तू द्यावा दीनालागी
दुर्बळांची रामा राखतोस पाठ
तूच मायपोट अनाथांचे

तुझ्या
लीलेमध्ये मी नाही येणार
मी नाही जोजार करणार
खुश राहो सारे नको कुणा दु: अखंडित सुख आत्मलाभ


तुझ्या विरहात नको लोटू मज
देवा हितगुज ऐक माझे

पुरा झाला माझ्या भेजाचा कबाड़ा
तुझा झालो वेडा प्रेमपाशी

लाविलेस पिसे मजसी केशवा
सोडून माधवा जेऊ नको

संतांचे उष्टे मी खाऊन जगेन
चरणी राहीन दास तुझ्या

*
मच्चित: सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनंक्ष्यसि ।।

*


राम कृष्ण हरि


*
हरि ॐ तत्सत् 
*
 

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

समाधि



समाधिचिया गावी जाण
वस्तीसी आले महाशुन्य
ते टळटळीत एकलेपण
आदिअंतविहीन गा

जे घडतचि नाही काही
तयाचे वृत्त सांगावे काय
आनंद शान्ति ज्ञानही
मुरुन गेले आपणांत

त्या महाबोधाच्या ठायी
सुखदु:खाची वार्ता नाही
अहम् इदम् बुडाले दोन्ही
तत्स्वरुपी ईश्वरा

अखंड तृप्ति समाधान
परेच्याही पैल खूण
जाणीव नेणिव परिमाण
उरले नाही भगवंता

तुझी कृपा सद्गुरू
गणतीसी माप काय करू
अथवा तुझे पाय धरु
कळेना मज गरीबासी

हरि तत्सत्
*
तो ईश्वरच शाश्वत सत्य आहे

शनिवार, १० डिसेंबर, २०११

पाईक





तुझ्या प्रेमास मी पात्र होण्यासाठी
सांग जगजेठी काय करू

आसवे सांडली शब्द ओसंडले
जीवास वाहिले पायी तुझ्या

तुझ्या दरबारी पत माझी नाही
दर्शनसुखाचेही भाग्य नसे

कळवळे
काळीज तुझ्यासाठी रामा
अनर्थास क्षमा कर बाबा

चुकांचा पर्वत मूढ भक्तीहीन
दीन
मी शरण आलो तुज

तुझ्या चरणांच्या सेवेचा पाईक
होवो मी आणिक काही नको

ग्रहणाच्या राती उजळावी स्मृती
हीच फलश्रुति द्यावी देवा

भक्तीचे
फळही भक्ती हेच असो
तुझ्या पदी वसो सुख माझे

अज्ञान हरपो माझे सच्चिदानंदा
कैवल्याच्या कंदा सगुणस्वरूपा


साईराम


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.