तुझ्या प्रेमास मी पात्र होण्यासाठी
सांग जगजेठी काय करू
आसवे सांडली शब्द ओसंडले
जीवास वाहिले पायी तुझ्या
तुझ्या दरबारी पत माझी नाही
दर्शनसुखाचेही भाग्य नसे
कळवळे काळीज तुझ्यासाठी रामा
अनर्थास क्षमा कर बाबा
चुकांचा पर्वत मूढ भक्तीहीन
दीन मी शरण आलो तुज
तुझ्या चरणांच्या सेवेचा पाईक
होवो मी आणिक काही नको
ग्रहणाच्या राती उजळावी स्मृती
हीच फलश्रुति द्यावी देवा
भक्तीचे फळही भक्ती हेच असो
तुझ्या पदी वसो सुख माझे
अज्ञान हरपो माझे सच्चिदानंदा
कैवल्याच्या कंदा सगुणस्वरूपा
ॐ
साईराम
ॐ