पैलथडीचा सूर लागतो
पाय थबकती येथे
ऐलपैल मग काहीच नुरते
धरती अंबर होते
सांगणेच उरले इतुके
मी माझा उरलो नाही
पाऊलखुणा ना माझ्या
दिंडी ही चालली आहे
तर्काचे तुटती तारे
आपुलकी बळकट धागे
अल्ला हा ईश्वर आहे
कान्हा येशुला सांगे
या भेटीगाठी आपुल्या
केवळ ना योगायोग
हा देश गड्यांनो आपुला
वाहता स्मृतींचा ओघ
आहेत पुण्यभूमीत
मशिदी चर्च मंदिरे
सा-याच घरांचे रस्ते
चौकात इथे मिळणारे
सत्याला पडतो प्रश्न
हे स्वप्न आहे का सारे
दुनियेत कुठे ना मिळतो
हा भारत देश जपा रे