मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

आत्मा व देह



देह हा अणू रेणुंनी बनलेला असतो.हा देह म्हणजेच आत्मा असतो.शुन्यातुन काहीही निर्माण होत नसते व जे असते ते कधीही शून्य होत नाही.हा आत्म्याचा गुण आहे.फक्त त्याचे रूप बदलत रहाते.देह पंचमहाभुतात विलीन झाले तरीही ते आस्तित्वात असते.अथवा ते अणू-रेणूंच्या स्वरूपात आस्तित्वात रहाते.म्हणजेच ते अनित्य भासले तरीही ते खरे पाहता नित्यच{अविनाशी आत्मतत्व}असते त्याचे नाम व रूप हे भौतिक देहाचे{आई जगदंबा भवानीचे}गुण असतात {जसे लाट उत्पन्न होते तेव्हा तिला लाट हे नाम प्राप्त होते व लाटेचे रुपही त्याच बरोबर प्राप्त होते परन्तु हे लाटेचे जन्मणे व नाश पावणे हे फक्त नाम-रुपापुरतेच मर्यादित असते;खुद्द पाणी{म्हणजे या बाबतीत आत्मतत्व}काही जन्मत व मरत नाही, समुद्रासही {म्हणजे परमेश्वरासही}काही जन्म-मृत्यु नसतो.तो कायम असतो, ज्ञात होत रहातो व प्रिय असणे हे आत्म स्वरुपाचे शाश्वत लक्षण सर्वत्र सारखेपणाने विद्यमान असते.हे आस्ति,भाति,प्रियत्व हे आत्म्याचे गुण असतात.अस्ति म्हणजे असणे, हे असणे शाश्वत असते.भाति हे प्रकाशणे आणि ज्ञान होणे असते.प्रियत्व म्हणजे प्रिय असणे.हे तिन्ही एकाच नित्य आत्मवस्तुचे{शिवाचे}गुण असतात.परन्तु देह अनित्य असतो.तो उत्पत्ति, स्थिति लय या अवस्था दर्शवितो.त्या अवस्था आत्म्याच्या अधिष्ठानावर दिसतात मात्र ही अनित्यता हा फक्त आभासच असतो.हे बदल स्वत: आत्म्यावर लागू नसतात.या तीनही अवस्थांमध्ये आत्म्यात काहीच फरक पडत नाही.

खरे पाहिले तर व्यक्तीचा म्हणजे जीवाचा देह या सर्व विश्वाचा म्हणजे समष्टिचा घटक आहे आत्मा हा सर्वव्यापी परमात्म्याचा अभिन्न अंश आहे.हे समग्र सगुण साकार व्यक्तिमत्व म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा होय.जरी संपूर्ण विश्व अवस्थात्रय अनित्यता दाखवित असेल तरी त्याच्यामागे नित्य सर्वव्यापी परमेश्वराचे अधिष्ठान असते देहाशी तादात्म्य पावलेला त्या पूर्णरूप परमात्म्याचा अंश आपला आत्मा असतो.

विश्वाचे
काही वस्तुमान आहे.त्याचे परिवर्तन सतत चालु असते.एका पदार्थाचे दुस-या पदार्थात रूपांतर घडत असते.परन्तु सर्व मिळून जे वस्तुमान असते ते आहे तेवढेच राहाते.या वस्तुमानाचे उर्जेत रूपांतर होऊ शकते.परन्तु जेवढी काही या विश्वाची संपूर्ण ऊर्जा आहे ती आहे तेवढीच रहाते.हे सबंध विश्वाचे उर्जेच्या स्वरूपात नित्य असणे पदार्थाच्या स्वरूपात अनित्य असणे आहे, तसाच प्रकार व्यक्त सृष्टि अव्यक्त परमात्म्याचा असतो.मात्र भौतिक वस्तुमान ऊर्जा दोन्हीही व्यक्त जगताचा भाग आहेत.ते ईश्वरी शक्तिची निर्मिती आहे.आणि जरी ते आभास असले तरीही ते शिवरुपच आहेत.कारण एका शिवाव्यतिरिक्त कुठेही,कधीही,काहीही नसते.तदनुषंगाने देहसुद्धा आत्मस्वरूप शिव परमात्माच आहे;एवंच देह आत्मा हे वेगवेगळे नाहीत. देह अनेक येतात जातात.जशा समुद्रावर लाटा उत्पन्न होतात व काही काळ राहून मग नष्ट होतात; परन्तु केव्हाही त्या समुद्राचा एक भागच असतात; तसेच ते देह सृष्टि चक्राचाच एक भाग असतात.परन्तु आत्मा त्या परमात्म्याचा अभिन्न अविकारी अंश असतात.आपण जेव्हा देहभावाने पाहतो तेव्हा तो अनित्य देह दिसतो परन्तु जेव्हा आत्मभावाने पाहतो तेव्हा तोच नित्य अविकारी आत्मा आहे असे प्रतितीस येते.हा फक्त दृष्टिकोनाचाच फरक आहे.


आता फक्त देहापुरताच मी आहे असे समजणारा आत्मा सर्वव्यापी परमात्मा यांच्यातील संबंध पाहू.घट म्हणजे मडके {हे फक्त नाम व रूप दर्शविण्यासाठी उदाहरण दिले आहे.प्रत्यक्षात मडके सुद्धा आत्मस्वरुपच असते.आकार तेवढा ध्यानात घ्या} हा देह आहे असे समजा.घटाच्या आतील आकाश म्हणजे आत्मा घटाच्या बाहेरील मोठ्ठे आकाश म्हणजे परमात्मा होय.घट अखंड असताना देखील ते बाहेरील आकाशाचा अभिन्न अंश होते घट फुटल्यानंतरही ते आहे तसे अबाधित बाहेरील मोठ्या आकाशाचा अभिन्न अंश राहिले.म्हणजे आत्मा हा सदैव पूर्ण परमात्माच असतो.केवळ मी देहापुरता मर्यादित क्षुद्र जीव आहे ही भेदबुद्धीच जिवाला क्षुद्रत्व आणते.अन्यथा जीव हा अनादी अनंत नित्यमुक्त नित्यशुद्ध शिवस्वरुप पूर्ण परमात्मा आहे यात काहीही संशय नाही. हा शिव परमात्मा एकजिनसीपणे, एकरसपणे, समत्वाने, सर्वत्र अभेदस्वरुपाने विराजमान असतो.

*
हरि तत्सत्
*

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

ध्येय



मी माझ्या एका स्वकर्तुत्वावर करोडपति झालेल्या मित्राला म्हणालो कि तुझ्या यशाचे रहस्य मला सांग म्हणजे मीही करोडपति होइन.त्यावर तो म्हणाला कि तू तसे काही करू नकोस.मी खट्टू होउन त्याला म्हणालो कि मग माझ्या आयुष्याचे ध्येय काय असावे?तो म्हणाला या प्रश्नाचे उत्तर मी तुला देणार नाही तर हे आत येत आहेत ते आमचे कीर्तनकार बुवा महाराज देतील.नंतर त्याने महाराजांना नमस्कार करून त्यांना माझा प्रश्न सांगितला आपण आज संध्याकाळी होणा-या कीर्तनाचा हाच विषय असावा असे त्यांना सुचविले.मी फारच नाराज होउन तेथून निघालो.मनात म्हणालो हा करोडपति फारच खडूस आहे.तो मला ठकवतोय.मला धन मिळविण्याचा उपाय सांगण्या ऐवजी या महाराजाचे कीर्तन ऐक म्हणतोय.मी काय कीर्तने ऐकली नाहीत काय आजवर.


तरीसुद्धा त्याच्या आग्रहाला मान देऊन मी ते कीर्तन ऐकले.बुवा उत्तम गायक होते त्यांच्या गायनाने कीर्तनात चांगला रंग आणला.शेवटी त्यांच्या कीर्तनाचा जो निष्कर्ष निघाला तो असा होता कि मोक्ष मिळविणे अर्थात परमेश्वर प्राप्ति हेच मनुष्याच्या देहाचे एकमेव ध्येय असायला पाहिजे.त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा "धन मिळविले कोट्यानुकोटीसंगे जाणार नाही लंगोटी । । " हा अभंग छान आळवुन गायला.


गीतेमध्ये सांगितले आहे कि देहममतेमुळे देहाचे सुख-दु:ख; आत्मा म्हणजे आपण स्वत: भोगतो व कर्माहंकारामुळे मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करणार, मी तमुक करणार असे म्हणतो.परन्तु वस्तुत: आपण कर्म करत नाही व कर्माचे फळ भोगत नाही.आत्मा अकर्ता व अविकारी असतो.देह प्रकृतिवशात कर्म करत असतो व कर्मफळ भोगत असतो.भौतिक विषयसुखे अनित्य असतात, मनुष्यप्राण्याला लाचार बनवतात व दारुण दु:ख़ास कारणीभूत ठरतात तरीसुद्धा आपण असेही म्हणू शकत नाही कि मी आता अजिबात कर्म करणार नाही.देह व इन्द्रिये आपापल्या गुणानुसार कर्म करीतच राहतात.जसे हात पाय तोंड बांधून मुटकुळे करून रथात टाकलेला माणूस काहीही कर्म न करता रथ जिकडे नेईल तिकडे रथाच्या वेगाने जात राहतो त्यानुसार प्राणी प्रकृतीचा गुलाम बनून कर्मे करतच राहतो.


मात्र प्रकृति ही परमेश्वराच्या अधीन असल्यामुळे व खुद्द परमेश्वरच देहाच्या ठायी आत्मस्वरुपाने निवास करत असल्यामुळे आपण अहंकाररहित व स्वार्थरहित वृत्तीने इश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास आपणास नैष्कर्म्य प्राप्त होते.आपण मोक्ष अर्थात परमात्मपदाची प्राप्ति करतो.


नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाsच्युत ।
स्थितोsस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ।।


*
हरि तत्सत्
*


शिवमद्वैतम्



शिवमद्वैतम्


शिव हा नित्य परमात्मा असून निराकार आहे.भवानी ही त्याची इच्छा शक्ती आहे.हे दोघेही अनादी अनंत आहेत.भवानी जगत रूपी आभास निर्माण करते. हा जगत रूपी आभास शिवाच्या अधिष्ठानावर दिसतो.हे जग असंख्य वेगवेगळ्या नाम रुपांनी व्यक्त झालेले भासते.ही सारी नाम रुपे अनित्य असतात.ती जन्म, स्थिति लय दाखवितात.

शिवभवानी कधीही वेगवेगळी दाखविता येत नाहीत.त्यांच्यात हा शिव व ही भवानी असा भेदही करता येत नाही.ते सतत एकमेकांबरोबरच असतात. शिव व भवानी यांच्यातील द्वैत सुद्धा खोटेच {मिथ्या} असून भवानी ही शिवाचा अंगभूत गुणधर्म असल्यामुळे तिने निर्मिलेले जगताचे जन्ममरणाचे चक्रसुद्धा अनादी अनंत आहे.तसेच जीवांच्या सुख दु:ख़ास कारण होणारे कर्म सुद्धा अनादी अनंत आहे.हे जगत केवळ आभास मात्र असेल तरीही ते शिवाच्याच अधिष्ठानावर भासत असल्याने तेहि केवळ शिवरुपच असते.एकंदरीत शिव, भवानी हे जोडपे व जगत रूपी त्यांचे बाळ हे सर्व मिळून फक्त एक शिवच असतो व त्या सर्वव्यापी शिवाखेरिज कुठेही, कधीही, अन्य काहीच नसते.

एवंच त्या सर्वव्यापी सर्वेश्वराशिवाय अन्य सारे भेद समजुतीचेच आहेत.
वैराग्य व सौभाग्य खरे तर एकत्रच नांदतात.परन्तु ते आपण एकाच वेळी पाहू शकत नाही.

जग का आहे याचे एकमेव कारण ईश्वरी इच्छा {म्हणजे भवानी} हेच होय. आपल्या चर्मचक्षुंना केवळ भौतिक जगच दिसते जे भवानीची निर्मिती असते. परन्तु जेव्हा आपण ज्ञानचक्षुंनी पहातो तेव्हा फक्त शिवच दिसतो. म्हणजे भवानी जेव्हा निवृत्त होते त्याच वेळी शिव दर्शन देतो. त्यानंतर मात्र आपणास खात्री पटते कि सर्व चराचरात एका शिवा वाचून अन्य काहीच नाही.अशा ज्ञानोत्तर अवस्थेत शिवभवानीचे दर्शन या सर्व जगात जिकडे पहु तिकडे सर्वत्र अनिर्बंध होऊ लागते.या अवस्थेला स्वैर समाधि असे म्हणतात. या स्थितीत भौतिक जगही शिवस्वरूपच दिसते.

*
हरि ॐ तत्सत्
*

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

शिवसाई




मी शिवसाई बोलतोय. मला क्लेश होत आहेत कारण समाजमन अजुनही एकसंध झालेले नाही, माझ्या प्रयत्नांची आवश्यकता अजुनही बाकी आहे. माझे जीवितकार्य संपलेले नाही. मी पंढरपुरच्या देवळात दर्शनासाठी गेलो असताना मला स्पष्ट ऐकू आले कि आता तुला श्रीखंड मिळेल. त्याचा अर्थ मला समजला नव्हता कारण श्रीखंड कोणते ते मला समजले नाही. परंतु नंतर माझ्याकडून एक पुस्तक लिहून प्रकाशित झाले. त्यावेळी मी माझ्या मित्रांना म्हणालो होतो कि हे माझ्या आयुष्याचे मंथन करून लोणी काढलेले आहे. नंतर मला स्वप्नात साईबाबा दिसले. ते गादीवर बसलेले होते व मी त्यांच्यासमोर उभा होतो.त्यांना मी कपाळास विभूती लावली व त्यांच्या हातात विभूती ठेवली. त्यानंतर त्यांनी माझ्या हातात एक छोटी कागदाची पुडी ठेवली, तिच्यावर शेवंतीच्या पाकळ्या होत्या.त्या लाल व पिवळ्या रंगाच्या होत्या { हळदी कुंकवा प्रमाणे } ती पुडी उघडल्यावर त्यातून तशीच दुसरी पुडी निघाली. तिच्यातूनही तशीच आणखी एक पुडी निघाली. अशा प्रकारे पुडीतून पुडी निघतच गेली. माझे स्वप्न संपले परंतु पुड्या निघणे चालूच होते.

ते स्वप्न पडल्यानंतर काही दिवसांतच हा माझा ब्लॉग सुरु झाला व तो आजतागायत सुरूच आहे. हा माझा ब्लॉग म्हणजे श्रीखंड आहे. मी पूर्वी लीलाविग्रही होतो, आता वाङ्मयविग्रही झालो आहे.हे सर्व एकाच कार्याचे दोन प्रकार आहेत.दोन्ही प्रकारांची आपापली वेगळी आवश्यकता असते.परन्तु ते दोन्ही प्रकार परस्पर पुरकच असतात.
*
हरि ॐ तत्सत्
*

सर्वगत चैतन्य


कित्येक अमेरिकन न्यूज चानेल्स प्राण्यांविषयी अस्वस्थ करणा-या बातम्या दाखवीत असतात. परंतु सत्य हे असेच आहे कि काही वेगळे आहे याविषयी तुम्हास थोडे सांगू इच्छितो. माझे स्वत:चे अनुभव वेगळे आहेत. त्यापैकी काही असे आहेत कि जे आपल्या संस्कृतीचे कायमचे भाग बनलेले आहेत.      

एक म्हणजे जे शाकाहारी पशु आहेत ते फक्त मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य होण्यासाठीच स्वत:चे जीवनयापन करीत असावेत की काय असा संशय यावा इतके त्यांच्या शिकारीचे बटबटीत चित्रीकरण दाखविले जाते.दुसरे म्हणजे त्या सर्वच प्राण्यांच्या संभोग क्रियांचे महत्व अतोनात वाढवून दाखविले जाते. परन्तु आहार निद्रा भय मैथुन एवढेच त्यांचे जीवन नसते.  

वास्तव वेगळे आहे. साधी गाय सुद्धा माणसांना किती प्रेम करते हे शहरी मुलांना अनुभवाला येत नाही. मी स्वत:च्या हाताने जेव्हा गायीला घास भरवायचो तेव्हा तिच्या डोळ्यांमधून कसे प्रेम पाझरायचे ते स्वत:च अनुभवले पाहिजे. जे कावळे आमच्याकडे घास खायला यायचे ते किती पोटतिडकीने आमच्याशी वेगवेगळ्या स्वरांत बोलायचे, तो त्यांचा लळा, ते सारे प्रेम  शब्दांच्या पलीकडले आहे. प्राणी, पक्षी निसर्गत:च खूप मायाळू असतात.

या व्यतिरिक्त खुद्द परमेश्वर सुद्धा प्राणी, पक्षी, कीटक यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करतो, त्याची कृपा, अभयदान आपल्या पर्यंत पोहोचवितो याचे कित्येक अनुभव माझ्या गाठीशी आहेत.

जे सर्वगत चैतन्य आपल्यात असते तेच त्यांच्यातही विराजमान असते. माझ्या पंढरपुरच्या वास्तव्यात  एकदा मी लौकिक अर्थाने फार आजारी होतो व सतत बिछान्यावर पडून असायचो. खरे सांगायचे म्हणजे मी आजारी नव्हतो; मी समाधी अवस्थेत गेलो  होतो. मला सर्वत्र परमेश्वर दिसू लागला होता. त्या अवस्थेत जरी मी सर्वोच्च अलौकिक सुखात होतो तरी मी माझी देहधर्माव्यतिरिक्त इतर नित्य-नैमित्तिक कर्मे व्यवस्थित करू शकत नव्हतो. एक दिवस मी ज्या चादरीवर दिवसभर झोपलो होतो ती चादर संध्याकाळी झटकून पाहिली असता तिच्यावर खूप सा-या लाल मुंग्या आढळल्या परंतु मी त्यांच्यावरच झोपलेलो असून सुद्धा दिवसभरात त्यातील एकही मुंगी मला बिलकुल चावली नव्हती.
 ॐ 
काय वानू आता 
न पुरे ही वाणी 
मस्तक चरणी 
ठेवितसे  
*
हरि ॐ तत्सत् 
*

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

मुक्तपणा


गिरिम {माझे आजोळ} येथे लहान असताना अतिशय सुखाने घालविलेल्या दिवसांची आठवण आजही त्या सुखाचा पुन:प्रत्यय देतात. मी फार तर चौथ्या इयत्तेत असेन. माझ्या अपेक्षा काहीच नसायच्या. सुख-दु:ख, गरिबी-श्रीमंती, इत्यादी गोष्टी आमच्या खिजगणतीतही नसायच्या. मी मातीत, चारीतील वाळूत खेळायचो. त्या क्षुल्लक गोष्टीतून अंतर्यामी आनंदाची अनुभूती यायची. एकूण एक गोष्ट आनंद स्वरूप दिसत होती; तेथील गारगोटी मध्येही हिऱ्यासारखे विलक्षण सौंदर्य होते,  त्यातून आनंदाची प्रभा झळकत असे. सूर्य डोक्यावर यायचा, दुपार कलत जायची, सांज सावल्या लांबत जायच्या, अंधारून यायचे. चुली पेटायच्या, गरम भाकरी, गावरान अंड्याची पोळी, भरीत, देशी गायीचे दुध व गूळ, या साध्या पण लज्जतदार जेवणानंतर गोधडी पांघरून उघड्या आभाळाखाली चांदण्या मोजत कधी झोपी जायचो कळायचे नाही. त्या कडबा पांघरलेल्या सपराखाली सुख हा शब्दही न उच्चारता किती अवर्णनीय सुख मिळाले ते अजूनही सांगता येत नाही. तिथे दुनियेशी संपर्कच नव्हता. तारीख, वार, घड्याळ इत्यादी काही जणू अस्तित्वातच नव्हते. लांबवर पसरलेल्या शेतजमिनी, पुढे क्षितिजरेखा आणि वर निरभ्र निळे आभाळ... सगळा आसमंत निर्मळ आनंदमय  होता. "बंधनची नसे ठावे त्यासी मुक्त कासयां म्हणावे" अशाप्रकारची माझी अवस्था तेव्हा होती.   

मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

रे सिंधुदुर्गा,

रे सिंधुदुर्गा,
मी प्रेमा व्यतिरिक्त तुला
काहीच देऊ शकणार नाही.
कुबेराला याचक काय देणार?
ही ओसंडून फुललेली हिरवाई,
  हे निसर्गसंपन्न डोंगर,
ही कौलारू मायाळू घरे,
हा दांडगाई करणारा पाउस,
हे निर्मळ, निर्व्याज हसणारे सागरतट,
या हिरव्या वनराजीत 
आल्हाददायक कूजन करणारे पक्षी  
यांच्याकडून मी घेतच राहिलो
तरी मला कित्येक जन्म पुरणार नाहीत.
हि तपोभूमी आहे 
जिथे सहज बसल्याजागी
भावसमाधी लागते.
हे सारे वैभव विधात्याचे आहे
जो फक्त देणंच जाणतो;
हे देणं आपण फक्त जतन करायचं,
त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचं,
हे सुंदर स्वप्न आपण जगायचं
इतके पुरे नाही का?

इथे भौतिक प्रगती गैरलागू आहे,
हे आध्यात्मिक उन्नती साधण्याचे
ठिकाण आहे, जिथे गांजलेल्या जीवाचे
परमात्म्याशी मिलन होते.
माझ्या प्रिय बांधवांनो, या,
या भूवैकुंठात आम्ही तुमचे
प्रेमाने स्वागत करतो.
इथे भगवान नारायण तुमच्यावर
कृपा करण्यासाठी सदैव
आतुर होऊन नेहमीच वाट पाहतो.
 
   ॐ    
 गोड तुझे रूप 
गोड तुझे नाम
आणिकाचे काम
नाही आता
ॐ 
 वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 
पक्षीही सुस्वरे आळविती 
येणे सुखे रुचे एकांताचा वास 
 नाही गुण दोष अंगा येत 
हरिकथा भोजन परवडी उपचार 
करोनी प्रकार सेवू रुची 
कंथा कमंडलू देह उपचारा 
जाणवितो वारा अवसरु
तुका म्हणे होय मनासी संवाद 
आपुलाची वाद आपणासी 

*
हरि ॐ तत्सत्
*


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.