तरीसुद्धा त्याच्या आग्रहाला मान देऊन मी ते कीर्तन ऐकले.बुवा उत्तम गायक होते व त्यांच्या गायनाने कीर्तनात चांगला रंग आणला.शेवटी त्यांच्या कीर्तनाचा जो निष्कर्ष निघाला तो असा होता कि मोक्ष मिळविणे अर्थात परमेश्वर प्राप्ति हेच मनुष्याच्या देहाचे एकमेव ध्येय असायला पाहिजे.त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा "धन मिळविले कोट्यानुकोटी। संगे जाणार नाही लंगोटी । । " हा अभंग छान आळवुन गायला.
गीतेमध्ये सांगितले आहे कि देहममतेमुळे देहाचे सुख-दु:ख; आत्मा म्हणजे आपण स्वत: भोगतो व कर्माहंकारामुळे मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करणार, मी तमुक करणार असे म्हणतो.परन्तु वस्तुत: आपण कर्म करत नाही व कर्माचे फळ भोगत नाही.आत्मा अकर्ता व अविकारी असतो.देह प्रकृतिवशात कर्म करत असतो व कर्मफळ भोगत असतो.भौतिक विषयसुखे अनित्य असतात, मनुष्यप्राण्याला लाचार बनवतात व दारुण दु:ख़ास कारणीभूत ठरतात तरीसुद्धा आपण असेही म्हणू शकत नाही कि मी आता अजिबात कर्म करणार नाही.देह व इन्द्रिये आपापल्या गुणानुसार कर्म करीतच राहतात.जसे हात पाय तोंड बांधून मुटकुळे करून रथात टाकलेला माणूस काहीही कर्म न करता रथ जिकडे नेईल तिकडे रथाच्या वेगाने जात राहतो त्यानुसार प्राणी प्रकृतीचा गुलाम बनून कर्मे करतच राहतो.
मात्र प्रकृति ही परमेश्वराच्या अधीन असल्यामुळे व खुद्द परमेश्वरच देहाच्या ठायी आत्मस्वरुपाने निवास करत असल्यामुळे आपण अहंकाररहित व स्वार्थरहित वृत्तीने इश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास आपणास नैष्कर्म्य प्राप्त होते.आपण मोक्ष अर्थात परमात्मपदाची प्राप्ति करतो.
नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाsच्युत ।
स्थितोsस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ।।
*
हरि ॐ तत्सत्
*
*