गिरिम {माझे आजोळ} येथे लहान असताना अतिशय सुखाने घालविलेल्या दिवसांची आठवण आजही त्या सुखाचा पुन:प्रत्यय देतात. मी फार तर चौथ्या इयत्तेत असेन. माझ्या अपेक्षा काहीच नसायच्या. सुख-दु:ख, गरिबी-श्रीमंती, इत्यादी गोष्टी आमच्या खिजगणतीतही नसायच्या. मी मातीत, चारीतील वाळूत खेळायचो. त्या क्षुल्लक गोष्टीतून अंतर्यामी आनंदाची अनुभूती यायची. एकूण एक गोष्ट आनंद स्वरूप दिसत होती; तेथील गारगोटी मध्येही हिऱ्यासारखे विलक्षण सौंदर्य होते, त्यातून आनंदाची प्रभा झळकत असे. सूर्य डोक्यावर यायचा, दुपार कलत जायची, सांज सावल्या लांबत जायच्या, अंधारून यायचे. चुली पेटायच्या, गरम भाकरी, गावरान अंड्याची पोळी, भरीत, देशी गायीचे दुध व गूळ, या साध्या पण लज्जतदार जेवणानंतर गोधडी पांघरून उघड्या आभाळाखाली चांदण्या मोजत कधी झोपी जायचो कळायचे नाही. त्या कडबा पांघरलेल्या सपराखाली सुख हा शब्दही न उच्चारता किती अवर्णनीय सुख मिळाले ते अजूनही सांगता येत नाही. तिथे दुनियेशी संपर्कच नव्हता. तारीख, वार, घड्याळ इत्यादी काही जणू अस्तित्वातच नव्हते. लांबवर पसरलेल्या शेतजमिनी, पुढे क्षितिजरेखा आणि वर निरभ्र निळे आभाळ... सगळा आसमंत निर्मळ आनंदमय होता. "बंधनची नसे ठावे त्यासी मुक्त कासयां म्हणावे" अशाप्रकारची माझी अवस्था तेव्हा होती.
गुरुवार, २६ जानेवारी, २०१२
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*