कित्येक अमेरिकन न्यूज चानेल्स प्राण्यांविषयी अस्वस्थ करणा-या बातम्या दाखवीत असतात. परंतु सत्य हे असेच आहे कि काही वेगळे आहे याविषयी तुम्हास थोडे सांगू इच्छितो. माझे स्वत:चे अनुभव वेगळे आहेत. त्यापैकी काही असे आहेत कि जे आपल्या संस्कृतीचे कायमचे भाग बनलेले आहेत.
एक म्हणजे जे शाकाहारी पशु आहेत ते फक्त मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य होण्यासाठीच स्वत:चे जीवनयापन करीत असावेत की काय असा संशय यावा इतके त्यांच्या शिकारीचे बटबटीत चित्रीकरण दाखविले जाते.दुसरे म्हणजे त्या सर्वच प्राण्यांच्या संभोग क्रियांचे महत्व अतोनात वाढवून दाखविले जाते. परन्तु आहार निद्रा भय मैथुन एवढेच त्यांचे जीवन नसते.
वास्तव वेगळे आहे. साधी गाय सुद्धा माणसांना किती प्रेम करते हे शहरी मुलांना अनुभवाला येत नाही. मी स्वत:च्या हाताने जेव्हा गायीला घास भरवायचो तेव्हा तिच्या डोळ्यांमधून कसे प्रेम पाझरायचे ते स्वत:च अनुभवले पाहिजे. जे कावळे आमच्याकडे घास खायला यायचे ते किती पोटतिडकीने आमच्याशी वेगवेगळ्या स्वरांत बोलायचे, तो त्यांचा लळा, ते सारे प्रेम शब्दांच्या पलीकडले आहे. प्राणी, पक्षी निसर्गत:च खूप मायाळू असतात.
या व्यतिरिक्त खुद्द परमेश्वर सुद्धा प्राणी, पक्षी, कीटक यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करतो, त्याची कृपा, अभयदान आपल्या पर्यंत पोहोचवितो याचे कित्येक अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
जे सर्वगत चैतन्य आपल्यात असते तेच त्यांच्यातही विराजमान असते. माझ्या पंढरपुरच्या वास्तव्यात एकदा मी लौकिक अर्थाने फार आजारी होतो व सतत बिछान्यावर पडून असायचो. खरे सांगायचे म्हणजे मी आजारी नव्हतो; मी समाधी अवस्थेत गेलो होतो. मला सर्वत्र परमेश्वर दिसू लागला होता. त्या अवस्थेत जरी मी सर्वोच्च अलौकिक सुखात होतो तरी मी माझी देहधर्माव्यतिरिक्त इतर नित्य-नैमित्तिक कर्मे व्यवस्थित करू शकत नव्हतो. एक दिवस मी ज्या चादरीवर दिवसभर झोपलो होतो ती चादर संध्याकाळी झटकून पाहिली असता तिच्यावर खूप सा-या लाल मुंग्या आढळल्या परंतु मी त्यांच्यावरच झोपलेलो असून सुद्धा दिवसभरात त्यातील एकही मुंगी मला बिलकुल चावली नव्हती.
ॐ
काय वानू आता
न पुरे ही वाणी
मस्तक चरणी
ठेवितसे
ॐ
*
हरि ॐ तत्सत्
*