खरे पाहिले तर व्यक्तीचा म्हणजे जीवाचा देह या सर्व विश्वाचा म्हणजे समष्टिचा घटक आहे व आत्मा हा सर्वव्यापी परमात्म्याचा अभिन्न अंश आहे.हे समग्र सगुण साकार व्यक्तिमत्व म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा होय.जरी संपूर्ण विश्व अवस्थात्रय अनित्यता दाखवित असेल तरी त्याच्यामागे नित्य व सर्वव्यापी परमेश्वराचे अधिष्ठान असते व देहाशी तादात्म्य पावलेला त्या पूर्णरूप परमात्म्याचा अंश आपला आत्मा असतो.
विश्वाचे काही वस्तुमान आहे.त्याचे परिवर्तन सतत चालु असते.एका पदार्थाचे दुस-या पदार्थात रूपांतर घडत असते.परन्तु सर्व मिळून जे वस्तुमान असते ते आहे तेवढेच राहाते.या वस्तुमानाचे उर्जेत रूपांतर होऊ शकते.परन्तु जेवढी काही या विश्वाची संपूर्ण ऊर्जा आहे ती आहे तेवढीच रहाते.हे सबंध विश्वाचे उर्जेच्या स्वरूपात नित्य असणे व पदार्थाच्या स्वरूपात अनित्य असणे आहे, तसाच प्रकार व्यक्त सृष्टि व अव्यक्त परमात्म्याचा असतो.मात्र भौतिक वस्तुमान व ऊर्जा दोन्हीही व्यक्त जगताचाच भाग आहेत.ते ईश्वरी शक्तिचीच निर्मिती आहे.आणि जरी ते आभास असले तरीही ते शिवरुपच आहेत.कारण एका शिवाव्यतिरिक्त कुठेही,कधीही,काहीही नसते.तदनुषंगाने देहसुद्धा आत्मस्वरूप शिव परमात्माच आहे;एवंच देह व आत्मा हे वेगवेगळे नाहीत. देह अनेक येतात व जातात.जशा समुद्रावर लाटा उत्पन्न होतात व काही काळ राहून मग नष्ट होतात; परन्तु केव्हाही त्या समुद्राचा एक भागच असतात; तसेच ते देह सृष्टि चक्राचाच एक भाग असतात.परन्तु आत्मा त्या परमात्म्याचा अभिन्न व अविकारी अंश असतात.आपण जेव्हा देहभावाने पाहतो तेव्हा तो अनित्य देह दिसतो परन्तु जेव्हा आत्मभावाने पाहतो तेव्हा तोच नित्य व अविकारी आत्मा आहे असे प्रतितीस येते.हा फक्त दृष्टिकोनाचाच फरक आहे.
आता फक्त देहापुरताच मी आहे असे समजणारा आत्मा व सर्वव्यापी परमात्मा यांच्यातील संबंध पाहू.घट म्हणजे मडके {हे फक्त नाम व रूप दर्शविण्यासाठी उदाहरण दिले आहे.प्रत्यक्षात मडके सुद्धा आत्मस्वरुपच असते.आकार तेवढा ध्यानात घ्या} हा देह आहे असे समजा.घटाच्या आतील आकाश म्हणजे आत्मा व घटाच्या बाहेरील मोठ्ठे आकाश म्हणजे परमात्मा होय.घट अखंड असताना देखील ते बाहेरील आकाशाचा अभिन्न अंश होते व घट फुटल्यानंतरही ते आहे तसे अबाधित बाहेरील मोठ्या आकाशाचा अभिन्न अंश राहिले.म्हणजे आत्मा हा सदैव पूर्ण परमात्माच असतो.केवळ मी देहापुरता मर्यादित क्षुद्र जीव आहे ही भेदबुद्धीच जिवाला क्षुद्रत्व आणते.अन्यथा जीव हा अनादी अनंत नित्यमुक्त नित्यशुद्ध शिवस्वरुप पूर्ण परमात्मा आहे यात काहीही संशय नाही. हा शिव परमात्मा एकजिनसीपणे, एकरसपणे, समत्वाने, सर्वत्र अभेदस्वरुपाने विराजमान असतो.
*
हरि ॐ तत्सत्
*
*