उभा श्रीपती राम कोदंडधारी
दैत्यांसी निर्दाळी मज अंगिकारी
सदा सज्ज कार्यार्थ जनहितकारी
जपे नाम रामाचे मम वैखरी
रामा तुझी वाट मी पाहते रे
तुझ्यासाठी मी गोड खाऊ आणला रे
भेटण्यास येशील तू खात्री आहे रे
कुपाळू आहे तू मला माहिती रे
जगाचा पोशिंदा आहेस तू रामा
तुझे नाम कामा येई माझ्या
अन्य न साधन मज कळो आले
डावपेच गेले वा-यावर
बुद्धि गेली वाया चोथा झाली काया
मला जगवाया रामनाम
ब-या वाईटाचे भान न राहिले
सारेच चांगले तुझ्या नामे
भिल्लिणीची व्याप्ति जंगलापुरती
प्रत्युत्पन्नमति मज केले
ऐसा तुझ्या रामा नामाचा महिमा
वर्णाया उपमा नाही नाही
उष्टावली बोरे माझा गोड रानमेवा
सुग्रास नैवेद्य देवा पोटभर खावा
माझ्या सुखासाठी रामा स्वीकार ही सेवा
शेष ठेऊ नको देवभक्तात दुरावा
तुझी गोड मूर्ति माझ्या नेत्री ठसवावी
श्रीरामा ही भोळी भक्ति पावन करावी
लेशमात्र अन्य आस माझी ना उरावी
तुझ्या पायी रामचंद्रा मुक्ति मज द्यावी
ॐ