सद्गुरुंनी केले आयुष्याचे सोने
नसता माझे जिणे व्यर्थ होते
विठ्ठल भेटला मज त्यांच्या कृपे
हरली सारी पापे आयुष्याची
काय मिळविणे कशाला जगणे
कोड पुरविणे इंद्रियांचे
पशुवत जगणे का आले वाट्याला
प्रश्न हा पडला होता मला
हरि भेटला अन प्रश्न विसरलो
दर्शनाने झालो आश्वस्त मी
माणसाला हवा स्पर्श पावित्र्याचा
दाखला युगांचा घ्या हो तुम्ही
दिव्यत्वा भेटण्या असे आसुसला
बिंदु हा सिंधुला मिळण्यास
विश्वाची रहाटी हरि चालवितो
मज भेटला तो पांडुरंग
विश्वाचे कारण पाहता साक्षात
जाहलो निवांत बाळापरी
आईच्या कुशीत असता बाळास
प्रश्नांचा प्रयास पडतो का
गोड झोप घेणे भुकेला रडणे
निर्व्याज हसणे बालकाचे
तैसी स्थिति झाली प्राप्त मज आता
डोळ्यापुढे त्राता हरि दिसे
ॐ