
विंझणवारा असाच नकळत
यावा दिसत नसावा
तप्त काळजा थंड करील जो
गुलाबजल शिडकावा
गुणगुणणे ओठांवरचे
अंगाई व्हावी कोणा
अन स्पर्शाचा आधार वाटो
भय विसरावे पुन्हा
जन्मभराचा जरी न मक्ता
कुणी कुणाचा घ्यावा
एकवेळचा घास कुणाला
मजला देता यावा
ऐक ईश्वरा मीही हसावे
आणि दुजाही हसावा
मनामनांचा मणभर बोजा
मी हलके उतरावा
अन्य कोणता ध्यास न मजला
स्नेह दुजाला द्यावा
हिशोब माझ्या आयुष्याचा
स्वल्प असावा देवा
उलगडणे कोडे दुनियेचे
आहे सोपे फार
समाधान चावी खाजिन्याची
प्रेम अनंत अपार
Love is God
Love for All