दुष्काळाने बोध दिला तुकोबांना
हाल अपेष्टांना अंत नाही
कष्ट ते सोसले सख्या ज्ञानोबांनी
झळाळे ज्वाळांनी खरे सोने
शेतकरी दोस्ता नको आत्महत्या
जाणून घे सत्या देव तुझा
विवेकाला नको देऊस तू फाटा
भोग तुझा वाटा प्रारब्धाचा
कर्मभोग कोणा चुकतोय का रे
भोगतात सारे संतजन
नाव घे देवाचे जाशील तू पार
देवाने करार केला आहे
पिलांना सांभाळी मांजरीचे दात
नाही हो लागत बाळकांसी
जीवनाची नौका नावाडी ईश्वर
सुखाने सागर पार कर
*****
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा
पती लक्ष्मीचा जाणतसे
सकळ जीवांचा करीतो सांभाळ
तुज मोकलील ऐसे नाही
आवडीने भावे हरिनाम घेसी
तुझी चिंता त्यासी सर्व आहे
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे
कौतुक तू पाहे संचिताचे
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
हरिकृपे त्याचा नाश झाला
ॐ