इंद्रिये गोविती
दु:स्वप्न निद्रेत
सत्यात जागृत
होऊ नेदी
व्यापक असुनी
होई बंदिवान
आत्म्याला लहान
तनु मानी
शुकाने नलिका
धरलेली स्वये
म्हणे मी गे माये
बांधलेलो
शरीरापुरता
नाही तू मनुजा
तू रे आत्मराजा
सर्वव्यापी
जन्म नि मरण
हे नोहे तुजला
अनित्य भासला
देह खोटा
सत्य स्वरूपाचे
ज्ञान घे तू वत्सा
होऊ नको पिसा
परमात्म्या
अगाध अपार
सर्वत्र शाश्वत
तू अपरिमित
परमेश