देवा मज नको / बळ बुद्धि धन /
तुज माझे मन / स्मरो नित्य //१//
नको मला देवा / तंदुरुस्त होणे /
बरे दीनवाणे / माझे सोंग //२//
नको अहंकार / चुकून मजला /
शपथ तुजला / देवा माझी //३//
तुझी तू चालव / माझी रोजीरोटी /
दया तुझी मोठी / माझ्यावर //४//
कळो वा न कळो / तुझी शक्ती कोणा /
सर्वशक्तिमाना / जाणले मी //५//
कशाला दाखऊ / फुकाचा रुबाब /
तू माझा साहेब / पांडुरंगा //६//
तुझी धर्मध्वजा / तूच मिरवीतो /
धनी आम्ही होतो / नाममात्र //७//
अंगाखांद्यावर / तुझ्या विठुराया /
बाळे बागडाया / आसुसलो //८//
प्रेमाची बिरुदे / धारण तू केली /
बाप व माउली / तूच एक //९//
रविवार, ४ नोव्हेंबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
