किती दुखापती झाल्या
बहु ठेचकाळलो मी
काट्याकुट्यातून रामा
तुझ्यासाठीच आलो मी
आता तुझ्या मांडीवर
माझा ठेवून माथा मी
झोप घेईन निवांत
असे तुला म्हणता मी
अंघोळ मी नाही केली
असे काय म्हणतो तू
देवा शोभते का तुला
काय बोलतोस हे तू
तुझ्यासाठी गांजलो मी
एक तुज ध्येय केले
नाही अन्य उठाठेव
मज करणे जमले
परि जाणून घे भाव
मन-शरीराची व्यथा
नाही झाले गंगास्नान
काय सांगू माझी कथा
देवा फक्त तुझी ओढ
मज खेचून आणते
अन्य काही ना दिसते
अन्य काही ना सुचते
नाही मंत्र स्नान दान
नाही पुराण कीर्तन
तुझे गोंडस हे ध्यान
हीच माझी साठवण
नाही अन्य आठवण
धुडकावले मी सारे
विनवितो देवा तुला
मज जवळ तू घे रे
तुझ्या नामाविन नाही
पुण्य गाठीला जोडले
देवा गोड घे करून
माझे संचित मी दिले
जगण्याला माझ्या अन्य
अर्थ उरलाच नाही
मज जवळ तू घ्यावे
पर्याय दुसरा नाही
हरि ॐ
देहवैकल्याचा वारा।झणें लागेल या सुकुमारा।
म्हणोनि आत्मबोधाचां पांजिरां।सुयें तयातें।।
ईशावास्यमिदं सर्वम्
ॐ