नको देवा असे
पाय दाबू माझे
ऋणाचे हे ओझे
फेडू कसे
नको देवा असे
सवे माझ्या फिरू
नको लाड करू
माझे देवा
असे म्हणता मी
देव तो रूसला
देव्हारी बैसला
चिडीचूप
तोंडावरी बोट
हातांची ती घडी
पायांची ती मांडी
घाली देव
असे काय देवा
सोंग तू आणले
मला ना रूचले
बिलकूल
किती वेळ बसू
अवघडुन मी
एवढ्याशा धामी
देव म्हणे
आता पुन्हा कधी
नाही फिरणार
तुझ्याबरोबर
म्हणे देव
असे म्हणता तो
झालो मी खजील
आता ना फाजील
बोलणार
तुझी लीला देवा
कळते तुलाच
अडाणी मी साच
भक्त तुझा
तुझी इच्छा मज
शिरसावंद्य रे
मोठेपण खरे
तुझे देवा