
युद्धाचे वेड तुम्हाला
शब्दांचे ओझे मजसी
ना कोमेजाव्या कळ्या
झिरपावे प्रेम मुळासी
राहता तुम्ही शेजारी
काळीज नाही उमगले
का वाचविण्या कोंबडे
रस्ते रक्ताने भिजले
ही कसली अहिंसा तुमची
हिंसेची झाली दासी
धर्माच्या नावावरती
देता धर्माला फाशी
शब्दाने ह्रदय हलावे
शस्त्राची काय मिराशी
पेटवू नका ही घरे
पेटवली चूल पुरेशी
ह्रदयाला गार करावे
तत्वालाही मुरडून
भिजलेल्या मातीमध्ये
येते जीवनही फुलून