
कष्ट साहतोसी माझ्यासाठी देवा
जिव्हाळा वर्णावा कैसा तुझा
प्रेमभावे माझे दाटले ह्रदय
कोणत्या उपाये व्यक्त करू
तुझ्या कृपाभारे वाकले हे झाड
लेकरांना धाड फळे खाया
मज रामा तुझे दास्यत्व आदिम
नामाचा उदिम सर्वकाळ
माझ्यापुढे काय मोक्षाचे ते काम
नामाचा डिंडिम वाजवी मी
दुमदुमो माझ्या देहाची ही खोळ
केले हे राउळ तुझ्या नामे
दाही दिशातून तूच मज भेटो
अन्य ना उमटो दृश्य काही
विठोबा तुजला हेच गा मागणे
इतर सुचणे नको मला
राम कृष्णी रत राहो माझे चित्त
दिसो दिनरात तुझे रूप
तुझा दिव्य भाव वसो माझ्या देही
नसे अन्य काही आस माझी
रामा हरि कृष्णा विठो नारायणा
पुरवी वासना जन्मोजन्मी
वाजो टाळघोळ मृदुंग कल्लोळ
गळा तुळशीमाळ हिंदोळावी
डोलो माझे पाय नामाच्या गजरी
राहो खांद्यावरी झेंडा तुझा