
तुजविण रामा । क्षण कंठवेना ।
तुज जाणवेना । व्यथा माझी ।।
जिवलग सखा । तुजऐसा नाही ।
कृपादृष्टि पाही । मज देवा ।।
एकला मी मृग । जग व्याध झाले ।
मरण लागले । पाठी माझ्या ।।
सांगतो निक्षून । अखेरचे तुला ।
सोडून तू मला । जाऊ नको ।।
जसा आहे तसा । तुझा आहे देवा ।
गोड हा करावा । मूढ़ बोल ।।
भले बुरे काही । जाणत मी नाही ।
तोंडाला जे येई । बरळतो ।।
मज दिले बळ । त्याने मी फुगतो ।
वल्गना करतो । अभिमाने ।।
रामा राहशील । सोडून मजला ।
कसा मी एकला। जगणार ।।
मज घे जवळ । आपला जाणून ।
दास आहे दीन । देवा तुझा ।।
आस आहे एक । तुझ्या आनंदाची ।
माझ्या जीवनाची । सार्थकता ।।