रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०
रविवार, ७ नोव्हेंबर, २०१०
वनवास

पहा दशरथाला आज पुत्रशोक झाला
सोडुनी अयोध्या माझा बाळ हा निघाला
हाय आज वनवासाला राम हा निघाला
देह त्यागुनी हो माझा प्राण हा निघाला
कोवळा कुमार सुंदर चालला वनाला
अयोध्या अनाथ करुनी नाथ हा निघाला
थांबवू कसा मी याला कुणी काही बोला
अभागी पिता मी याचा कसा अडवू याला
दैव दुष्ट माझे सारा उपाय खुंटला
जानकी व लक्ष्मणासवे राम हा निघाला
प्रेमपाश माझे सारे तोडुनी निघाला
तीर धनुष्याला जणू हा सोडुनी निघाला
पुत्र करी आज पित्याच्या वचनपालनाला
शोकसंकटात अयोध्या टाकुनी निघाला
।। हरे राम ।।
शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०
मातीमोल

किती युगांचा अंधार
उरी साचत राहतो
जेव्हा तुझी भेट देवा
मला कुणी नाकारतो
देवा किती युगे गेली
किती धर्म बदलले
जुने मोडून काढले
नवे अवतार घेतले
किती नामे बदलली
किती रुपे मी घेतली
तुझ्या प्रेमासाठी देवा
सोंगे किती सजवली
वैकुंठाला सोडून मी
किती वेळा रे यायचे
तुझ्या चैतन्या ऐवजी
पाषाण हे कवळायाचे
कशा बेड्या तुझ्या तोडू
कशी दारे ही उघडू
उभ्या भेदाच्या या भिंती
काय करून मी पाडू
देवा थकलो थकलो
देवा हरलो हरलो
इथे मातीमोल झालो
तुला सोडून मी आलो
असा किती वेळा रामा
जाशील तू शरयुमधे
जगी लांडीलबाडीच्या
भक्ति जाते भुमीमधे
देवा तुझे माझे प्रेम
कसे यांना कळायचे
यांनी काढले विक्रीला
माणुसपणसुद्धा यांचे
ॐ
बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०
दिवाळीचा फराळ

नको जाऊ कोमेजुन
दोन घास घे खाऊन
ताट भरून पक्वान्न
आला खडाही चुकून
त्याला बाजुला सारून
घ्यावे गोड तू करून
देवा आणले रांधून
कसेबसे मी कष्टानं
नाही दिसत डोळ्यानं
परि भाव घे जाणून
रामा तुझ्याच सुखानं
तृप्त होई माझे मन
तुझ्या डोळ्यांच्या ज्योतीनं
जग जाते उजळून
जातो प्रकाश भरून
सा-या कोनाकोप-यानं
तुझ्या दिवाळी सणानं
फुले लख्ख तारांगण
।। राम कृष्ण हरि ।।
ॐ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
