सुखी रहा बाळांनो
एवढे आहे मागत
तुम्हाला सोडून नाही
मजला सुख अन्य कशात
आहे माझ्या पदराला
बळ आभाळाच्या इतके
आभाळ ठेंगणे होते
जेव्हा तुम्हांस पहाते
मी वा-याशी भांडते
तुमचा कैवार मी घेते
मागणे तुम्हाला इतके
की रहा खेळते हसते
मी पहाडसुद्धा होते
संकटास मी थोपविते
मी लोळ विजेचा होते
दु:खावरती कोसळते
भिऊ नका आहे पाठीशी
मी समर्थ आहे आई
तत्पर तुमच्या हाकेला
मी सदा धावुनी येते
मी सर्वांची माउली
सांगते तुम्हा सर्वांना
उतमात करू नका कधी
मी सुख सगळ्यांना देते