दर्शन देऊनी तृप्त मज केले
विठ्ठले वत्सले पांडुरंगे
जीवनाचे मज वर्म सापडले
वैकुण्ठ दाविले भूमीवरी
आता एक कृपा करी मजवरी
तुझे नाम हरि सुटू नये
संपले धावणे नाही येणे जाणे
ठायीच भोगणे भक्तिसुख
पाहुनी श्रीमुख डोळे ओलावले
कर्म नष्ट झाले नि:शेष ते
पवित्र हे माझ्या नयनांचे जळ
वाहे घळघळ भक्तिने जे
पवित्र हे माझे अवघे शरीर
तुझ्या पायांवर लोळते जे
देवा ऐसे कर राहो निरंतर
या चरणांवर माझे शिर
दुसरा विषय नको मला देवा
माझे हे आस्तित्व तदर्पण
नाही आता मज कशाची फिकिर
माझा सर्व भार तुझे पायी
सर्वभावे तुझा होऊन राहीन
हेचि वरदान मज देई
ॐ