तव भक्तीची उन्नत शिखरे
एक एक मी आक्रमितो
कधी प्रेमाने हर्षित होतो
कधी विरहाने व्याकुळतो
तुझ्या नि माझ्या प्रेमाचा हा
रंग आहे भलताच जुना
जीव शिवाच्या लपाछ्पीच्या
अनादी या दिसतात खुणा
अज्ञानाच्या अवगुंठनी मी
तू मायेच्या पडद्यात
तू माझा मी तुझा असुनी
मी व्यर्थ पोळतो दु:खात
विसरुनी तुज मी व्यथित होता
अवचित येतो तू पुढती
खुद्कन माझी कळी उमलते
सर्व व्यथा पळुनी जाती
तुझ्या मनीचे तूच जाणसी
मेहरबान जरी होसी तू
पुन्हा सोडुनी मला एकटा
कुठे फिराया जासी तू
ॐ