तुझे नाम रामा मी घेणार नाही
असा नेम केला जरी मी किती
जिव्हा बोलते ऐकते नाम श्रुति
घोंघावते मन तुझ्याभोवती
अनाहत संकीर्तन तुझे येई कानी
सुगंध तुझा घ्राणि येई दिव्य
रुसण्यात माझ्या नसे अर्थ देवा
तुझ्याविना जीवा नसे माझ्या ठाव
नसे तू जिथे नेत्र पाहती तुला
कसे सांग रामा मी सोडू तुला
का वेड तू लाविले सांग मजला
दश इंद्रियांनीही एल्गार केला
माझा म्हणुनी पोशिला आजवर मी
अहंकार तोही ना माझा उरला
तू काय गारुड केलेस रामा
सगळ्यात मज तू दिसे एकला
स्वतंत्र नाही मी तुझा गुलाम
वेटाळुनी घातला प्राणबंध
तुझा मी तुझा मी अगा रामचंद्रा
युगानुयुगे आपुला हा संबंध
हजारो मुखांनी तुझी कीर्ति गाता
वाणी अपुरी शब्द विलयास जाती
विश्वात्मका मी तुझा शेष आहे
तुझ्याविना जरी नसे काही जगती
ॐ