प्रकाश अंधार / एकारले सारे /
सूर्य चन्द्र तारे / एक झाले //१//
जवळ स्वतःच / दूरचे ते झाले /
परके आपले / सारे एक //२//
तू आणि तोपण / झालो मी स्वतःच /
नपुंसक तेच / स्त्री पुरुष //३//
बाप आणि माय / बाळ स्वतः झाले /
गुढगे टेकले / व्याकरणे //४//
वर्णन करू मी / भाषेत कुठल्या /
नाही ऐकावया / दुजे कुणी //५//
डोळे दृष्टी दृश्य / आवाज व कान /
कर्म आणि ज्ञान / एक झाले //६//
शब्दाचा विलय / ध्वनी स्वतः झाला /
अशा अवस्थेला / काय म्हणु //७//
एकपणे दिली / बुडी ती स्वतःत /
अर्थ तो मौनात / विसावला //८//
देवा तू दिलीस / भक्ती मला दान /
मला तुझ्यातून / सूट दिली //९//
त्यायोगे गातो मी / तुझे गोड नाम /
नाही तरी काम / काय मला //१०//
रविवार, २१ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
